रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील साडवली-कासारवाडी गावातील राजेंद्र धने यांच्या घरामागे जखमी अवस्थेत सापडलेल्या बिबट्याला वनविभागाने पकडून त्याच्यावर दोन दिवस उपचार केले; मात्र पुरेशी यंत्रणा नसल्याने अधिक उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, त्या बिबट्याला गुरुवारी (ता. १८) पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
बुधवारी (ता. १७) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या धने यांच्या घरामागे येऊन बसला होता. पायाला जखम झाल्यामुळे त्याला वेगवान हालचाल करणे शक्य होत नव्हते. घराच्या परिसरात मुक्तपणे तो फिरत होता. परिसरात माणसांचा कोलाहल असला तरीही तो आक्रमक झालेला नव्हता. बिबट्या नर जातीचा असून, त्याचे वय साधारण ३ ते ४ वर्षे आहे. त्याच्या डाव्या मागील पायाच्या मांडीला जखम झाली होती. तो उपाशी असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला होता. त्या बिबट्याला पकडून संगमेश्वर येथे आणले गेले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते. बिबट्याला ठेवलेला पिंजराही आकाराने लहानच असल्याने उपचार करताना अडचणी आल्या. त्यावरही मात करत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंजेक्शन देणे किंवा सलाईन लावणे, असे उपचार केले; परंतु त्यातील मर्यादा लक्षात घेऊन अखेर अधिक उपचारासाठी बिबट्याला पुण्यातील रेस्क्यू केंद्रात पाठवण्याचा निर्णय वनविभागाकडून घेण्यात आला. त्यानुसार बिबट्याची रवानगी तिकडे करण्यात आली. त्याची तब्येत सुधारत असल्याचे प्रादेशिक वनाधिकारी प्रकाश सुतार यांनी सांगितले.
टीटी सेंटरचा प्रस्ताव प्रलंबित
जिल्ह्यात बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खाद्य पकडण्यासाठी लोकवस्तीजवळ येण्याचे प्रकार वाढत आहेत. बिबट्या विहिरीत पडणे, घरामध्ये शिरणे, विविध कारणांमुळे जखमी होणे अशा घटना लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (टीटीसी) सुरू करावी, असा प्रस्ताव वनविभागाकडून शासनाकडे पाठवण्यात आला आहे; मात्र त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही. काही दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यात ब्लॅकपँथरचा बछडा आढळला होता. त्याला उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आले. अशा प्राण्यांवर उपचार करणारे केंद्र तयार करावे, अशी मागणी प्राणीप्रेमींकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 20/Sep/2025












