Rajapur ST Depo : राजापूर आगाराचे वेळापत्रक कोलमडले

राजापूर : गेल्या काही महिन्यांपासून राजापूर एसटी आगाराचे वेळापत्रक रुळावरून घसरले आहे. राजापूर आगारातून सायंकाळी सुटणाऱ्या वस्तीच्या गाड्या विलंबाने धावत असल्याने त्याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. राजापूर आगाराच्या या अनागोंदी कारभाराबाबत प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेले काही दिवस राजापूर आगाराच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये अनियमितता आली असून, बऱ्याच गाड्या वेळेवर सुटत नाहीत. सायंकाळी सुटणाऱ्या वस्तीच्या गाड्या तर खूपच विलंबाने राजापूर आगारातून सुटतात, असे चित्र सातत्याने पाहावयास मिळत आहे. सायंकाळच्यावेळी सुटणाऱ्या जैतापूर, येरडव, बुरंबेवाडी यांसह अन्य काही गाड्या तर त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास विलंबाने राजापूर आगारातून सुटत आहेत. काहीवेळी तर त्याहून अधिक उशीर होतो. काहीवेळा तर प्रवाशांना कोणतीच पूर्वकल्पना न देता बस अचानक रद्द केल्याचे प्रकारदेखील घडले आहेत. दररोज राजापूर शहरात शासकीय तसेच विविध कामांसाठी, खरेदीसाठी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येत असतात.

शासकीय कामांसाठी आलेले नागरिक सायंकाळी उशिरा आपापल्या गावी परतत असतात. त्या वेळी वेळेवर गाडी सुटत नसल्याने बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. त्याचवेळी विलंबाने बस सुटत असल्याने दूरवरच्या प्रवाशांना त्यांच्या घरी पोचायला खूप उशीर होतो. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव सणाच्या काळात राजापूर आगारातून काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचा प्रवाशांना फटका बसला. आगाराच्या कोलमडलेल्या नियोजनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, प्रवाशांना सुलभ प्रवास करता यावा या दृष्टीने नियोजन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दिवसाच्या आणि सायंकाळी वस्तीच्या गाड्या उशिरा सुटत आहेत. त्यामुळे प्रवाशांना घरी जायला उशीर होतो. याचा विचार एसटी आगार प्रशासनाने गाड्याच्या वेळापत्रकाचे योग्य नियोजन करावे-शरद देसाई, प्रवासी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 20/Sep/2025