चिपळूण : शासनाच्या माझी वसुंधरा अभियानासारखा पर्यावरणपूरक उपक्रम चिपळूण नगरपालिका राबवत आहे. असे असतानाच गुरुवारी (ता. १८) पालिकेच्या मालकीच्या एका शॉपिंग सेंटरच्या पटांगणातील कदंब (नीव) वृक्ष पूर्णपणे तोडून बोडका करण्यात आला आहे. ही बाब निसर्गप्रमी शाहनवाज शाह यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला; मात्र प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीचे कारण पुढे केले.
चिपळूण शहरातील शॉपिंग सेंटरच्या मैदानात भलामोठा कदंब वृक्ष आहे. त्याची सावली सर्वांसाठीच उपयुक्त ठरते. कदंब वृक्ष निसर्गसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहे; मात्र काल त्या वृक्षाच्या फांद्या पालिका प्रशासनाकडून तोडण्यात आल्या. त्यामुळे कदंब वृक्ष पांगळा झाल्याचा आक्षेप घेत चिपळूणमधील पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्ष्यांची विष्ठा वाहनांवर पडू नये या कारणासाठी त्या वृक्षाच्या फांद्या तोडल्याचे कारण पालिका प्रशासनाकडून पुढे करण्यात आले आहे. निसर्गप्रमी शाहनवाज शाह यांनी याबाबत उद्यान विभागप्रमुखांशी संपर्क साधला होता. त्यांनी परिसरातील काही नागरिकांच्या याबाबत तक्रारी आल्यामुळे झाडाच्या फांद्या तोडल्याचे स्पष्टीकरण दिले.
कदंब (नीव) या झाडाच्या केवळ फांद्या तोडलेल्या आहेत. हे झाड उंच वाढते. फांद्या तोडल्यानंतर ते गोल आकाराने वाढत जाते. भविष्यात ते आणखी वाढणार आहे- मंगेश पेढांबेकर, प्रशासन विभागप्रमुख, चिपळूण पालिका
कदंब (नीव) हे झाड दुर्मीळ होत चालले आहे. या झाडाची फळे जमिनीत पडल्यानंतर आपोआप रोपे तयार होऊन नवीन झाडे तयार होतात. हा वृक्ष उंच गेल्यानंतर तो कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे तो उंच वाढणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. – समीर कोवळे, पर्यावरणप्रेमी, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 20/Sep/2025












