सायबर क्राईम रोखण्यासाठी प्रबोधन गरजेचे : सिया शेरे

राजापूर : सायबर क्राईमचा टक्का वाढत आहे. सायबर क्राईम वेळीच रोखण्यासाठी व्यापक समाज प्रबोधनाची गरज आहे. ही गरज ओळखून तुम्ही सर्वजण सायबर क्राईम विषयी समाजात उतरून सायबर क्राईम विषयी प्रबोधनाचे काम करा, असे आवाहन रत्नागिरी येथील कोलते कॉम्प्युटरच्या समन्वयक सिया शेरे यांनी केले.

रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ‘सायबर क्राईम’ विषयावर त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, गुन्हेगारी विषयी समाज जागृत असला तर गुन्हेगारीला आळा बसतो. आज समाजात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे पण सायबर क्राईम चिंता वाढवणारा आहे. अनेक वेळा सहजगत्या आर्थिक गंडा घातला जातो. हे काम करणाऱ्या अनेक टोळ्या आज समाजात कार्यरत आहेत.

बँकेत फसवणूक, फेसबुकवर फसवणूक, समाजात दहशत पसरवणारे चॅटिंग, फोनवरून कोड नंबर घेऊन फसवणूक अशा विविध मार्गानी लोकांना फसवले जात आहे. यामुळे सर्व लोकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे, असा सावधानतेचा इशाराही दिला. डॉ. बी. टी. दाभाडे म्हणाल्या, सायबर क्राईम हे गुन्हेगारीचे व्हाईट कॉलर रूप असून ही गुन्हेगारी रोखली गेली पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी सजग राहून काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:48 PM 20/Sep/2025