शिक्षण प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याचा अनुभव देणारे असावे : शोभा नाखरे

कडवई : शिक्षण हे फक्त पुस्तकी न राहता प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याचा अनुभव देणारे असावे. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा, पण एका मयदिपर्यंत. कारण मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांची शक्ती कमी होते, श्रवणशक्तीची हानी होते. झोपेवर परिणाम होतो लहान वयात अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन, खेळ, शारीरिक हालचाल यावर भर द्यावा असा सल्ला राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या सेवानिवृत्ती मुख्याध्यापिका शोभा नाखरे यांनी दिला.

कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागातर्फे ‘चला, आनंद शोधुया!’ या विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, वैयक्तिक स्वच्छता आणि पर्यावरण जतन करण्यासाठी कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, परसबागेतील रोप लागवड करणे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नैसर्गिक चक्र समजून घेता येते आणि पर्यावरणाशी जोडले जातात. तुमचं यश पर्वता एवढं असो, तरी आई एवढी महान कोणीच नाही. विद्यार्थ्यांनी कुटुंब विशेषतः आई-बाबांप्रती कृतज्ञतेची भावना बाळगावी, असे त्यांनी
सांगितले.

यावेळी मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, महाराष्ट्र उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक रिदवान कारीगर, संतोष पुरोहित, भाग्यदेवी चौगुले, सिद्धी सुर्वे, आशिष सरमोकादम, सोमनाथ कोष्टी, मिलिंद कडवईकर, प्रदीप कानाल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश कुंभार, आभार शशिकांत किंजळकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 20/Sep/2025