खेड-दापोली मार्गावरील नव्या वृक्ष लागवडीची नासधूस

दापोली : खेड-दापोली राज्य मार्गावर कुंभवे आणि नारगोली परिसरात काही दिवसांपूर्वी वृक्षलागवड करण्यात आली होती. या झाडांचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या काही अज्ञात व्यक्तींनी काढून नेल्या आहेत. एवढेच नव्हे, तर झाडांची मोडतोड करून नासधूसही करण्यात आली आहे. यामुळे अनेक झाडे कोमेजून जाण्याच्या मार्गावर आहेत.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करून वृक्षलागवड मोहीम राबवली जाते. कुंभवे, नारगोली या भागांतही अशीच वृक्षलागवड करण्यात आली होती. गुरांनी ही रोपे खाऊ नयेत, यासाठी त्याभोवती संरक्षक जाळीही लावण्यात आली होती. मात्र, ती जाळी काढून नेण्यात आली असून, रोपांचीही नासधूस करण्यात आली आहे.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने तत्काळ या प्रकाराची दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 20/Sep/2025