Sangameshwar : संगमेश्वरात रिक्षा व्यावसायिकांना समुद्र संदेशाबाबत मार्गदर्शन

आरवली : समुद्र संदेश अभियान, सागरी सुरक्षा, अमली पदार्थ तस्करी, अवैध शस्त्र यांबाबत रिक्षा व्यावसायिकांमध्ये जागृती व्हावी, त्यांना माहिती व्हावी, यासाठी रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखलीच्या व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संगमेश्वर पोलिस स्थानकातील श्रमसाफल्य सभागृहात पार पडली. या बैठकीत पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

या सभेला रिक्षा मालक चालक संघटनेचे पन्नासहून अधिक सदस्य उपस्थित होते. या बैठकीत रिक्षा व्यवसायातील समस्या, तसेच विविध कायदेविषयक विषयांवर चर्चा करण्यात आली. पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी समुद्र संदेश अभियानाची माहिती दिली, तसेच सागरी सुरक्षा, अमली पदार्थ तस्करी आणि अवैध शस्त्र याबद्दल जागरूकता याबाबत मार्गदर्शन केले. मासेमारी व्यवसाय सुरक्षा, हवामानाचे वारे, आपत्ती व्यवस्थापन या विषयांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे व्हॉट्सअॅप चॅनेलचा कोड स्कॅन करून याबाबतचे अपडेट प्राप्त करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी केले.

यावेळी कडवई बीट अंमलदार संदेश जाधव, रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण, उपाध्यक्ष संदीप चिले, सचिव मोहन ओकटे, राजा येलोंडे, लक्ष्मण मयेकर, अरफात खतीब, राजेंद्र भोजने, दिलीप जोयशी, दिनेश कुवळेकर, प्रमोद शिंदे, तुषार कदम, आत्माराम मयेकर यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 20/Sep/2025