रत्नागिरी : नवरात्रीचा (Navratri) उत्साह सर्वत्र दिसून येत असताना, रत्नागिरीतील महिलांसाठी आदिशक्तीच्या दर्शनाचा एक अनोखा योग जुळून आला आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा दीपक पवार यांनी सलग चौथ्या वर्षी हा उपक्रम राबवला आहे. प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील महिलांना रत्नागिरीतील प्रसिद्ध मंदिरांसोबतच काही महत्त्वाच्या शक्तिपीठांचे दर्शन घेता येणार आहे.
प्रमुख देवींच्या दर्शनाचा सोहळा
या विशेष दर्शन सोहळ्यामध्ये भगवती, महालक्ष्मी, जुगाई, नवलाई आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आडिवरे येथील महालक्ष्मी देवीचा समावेश आहे. महिलांना देवीच्या दर्शनाचा लाभ घेता यावा, ओटी भरता यावी आणि फुलं अर्पण करता यावीत यासाठी हा खास दौरा आयोजित करण्यात आला आहे. नोंदणी करणाऱ्या सर्व महिलांसाठी या दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
२३ आणि २४ सप्टेंबर रोजी AC बसची सुविधा
या दर्शन सोहळ्यासाठी २३ आणि २४ सप्टेंबर रोजी दोन दिवसांसाठी एसी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस सकाळी ९ आणि सकाळी १० वाजता सोडण्यात येणार आहेत. महिलांना प्रवासात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी वातानुकूलित बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच, उपवासाच्या नाश्त्याचीही खास व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या विशेष कार्यक्रमासाठी महिलांना आपली नावे नोंदवून जागा निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी शिल्पाताई सुर्वे (९४२३८७४९८१), पूजा दीपक पवार (९२८४५२९८२७), शिवानी ताई पवार (७७०९३८०९४७), काव्या कामतेकर (७०२००३७८२५), आणि अंजली सावंत (९२२६९३३७०४) यांच्याशी संपर्क साधता येईल.
हा उपक्रम महिलांना धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभूती देणारा असून, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. नवरात्रीच्या या पावन पर्वात सर्व महिलांना देवीच्या दर्शनाचा लाभ मिळवून देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.














