Lanja : बेपत्ता तरुणाचा झापडे धरणात आढळला मृतदेह

लांजा : कामावर जातो असे सांगून घरातून निघून गेलेल्या व बेपत्ता असलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. विशाल बाळकृष्ण माजळकर (वय ३५, रा. माजळ, माजळकरवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून शनिवारी त्याचा कोंड्ये-झापडे धरणात मृतदेह आढळून आला.

विशाल हा लांजा येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. तो आपल्या माजळ या गावी पत्नी, आई आणि दीड वर्षांचा मुलगा यांच्या सोबत राहत होता. विशाल हा १९ सप्टेंबर रोजी दुपारपासून बेपत्ता होता. त्यामुळे कामावर गेलेला विशाल घरी न परतल्याने व मोबाईलवर संपर्क होत नसल्याने घरच्यांनी व नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्याचा पुन्हा शोध घेतला असता शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान विशाल त्याची मोटारसायकल कोंडये-झापडे धरणाच्या किनाऱ्यावर आढळून आली. मोटारसायकच्या डिकीत मोबाईल, पैसे व चप्पल आढळून आले. त्यामुळे गावकरी, नातेवाईक यांनी धरण परिसरात त्याचा पुन्हा शोध घेतला असता आढळून आला नाही.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी नागरिकांनी पुन्हा कोंड्ये झापडे धरण परिसरात शोध घेतला असता बेपत्ता विशाल माजळकर याचा धरणाच्या पाण्यात मृतदेह आढळून आला. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, विशाल याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार नाशिर नावळेकर करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 22/Sep/2025