Guhagar : वेलदूरमधील सौरऊर्जा पॅनलच्या चोरीप्रकरणी दोघांना साताऱ्यातून अटक

गुहागर : गुहागर तालुक्यातील वेलदर येथील जानकी फार्म हाऊसमधून सुमारे ९ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या ‘विक्रम’ कंपनीच्या ४५ सौरऊर्जा पॅनलची चोरी झाल्याचा प्रकार गुहागर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सातारा येथून दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मौजे वेलदूर येथील जानकी फार्महाऊसच्या मोकळ्या व्हरांड्यातून हे पॅनल चोरीला गेले होते. याबाबत गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी तत्काळ तपास सुरू केला.

पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी एक विशेष पथक तयार करीत तपास केला. या तपासणीमध्ये सातारा येथील अतुल अंबादास थोरात याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली.

चौकशीत आरोपी अतुल थोरात याने चोरलेला मुद्देमाल त्याचा मित्र आणि सह-आरोपी अतुल सोमनाथ चौधरी (रा. खातगुण, ता. खटाव) याच्या मदतीने सातारा येथे नेल्याची कबुली दिली. गुहागर पोलिसांनी तातडीने साताऱ्यात जाऊन दोन्ही आरोपींना अटक केली आणि सुमारे ९ लाख ४५ हजार रुपये किमतीचे ४५ सौरऊर्जा पॅनल जप्त केले. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 22/Sep/2025