Navaratri utsav : कोतवडेत आजपासून शारदीय नवरात्रोत्सव

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सोमवारपासून (ता. २२) शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री कुसुमेश्वर महालक्ष्मी ब्रह्मवृंद उत्सव मंडळ आणि पब्लिक देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे.

उद्या सकाळी १० वाजता घटस्थापना होणार आहे. दररोज सकाळी श्री महालक्ष्मीची षोड्शोपचार पूजा, अभिषेक, दुर्गासप्तशती पाठवाचन व रात्री ८ ते ९ निरनिराळ्या वाडीतील भजने, ९ ते १२ आरती, भोवत्या, मंत्रपुष्प व कीर्तन यांचे आयोजन केले आहे. २२ रोजी मंगलाचरण, श्री गणेशास्तव निरंजन स्वामी, २३ ला रामकथा प्रवचन मोहकबुवा, २४ रोजी श्रीधर स्वामी महाराज, २५ रोजी माहूरगड निवासी रेणुकामाता यांवर ह.भ.प. मोहकबुवा रायकर (डोंबिवली) कीर्तन करणार आहेत. २६ रोजी गर्वहरण- गरुड, सत्यभामा, बलराम, २७ रोजी अहिल्या उद्धार, २८ ला रुक्मिणी स्वयंवरावर ह.भ.प. ज्ञानेशबुवा जोशी धानोरकर (पुणे) कीर्तन करणार आहेत. २९ आणि ३० सप्टेंबरला रात्री भोवत्या, संगीत आरत्यांचे आयोजन केले आहे. १ ऑक्टोबरला सौ. संगीता बापट आणि सहकारी गीतरामायण आणि २ ऑक्टोबरला लळिताचे कीर्तन ह.भ.प. सुधाकरबुवा परांजपे (कोतवडे) सादर करतील. कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा.

तसेच महालक्ष्मीमातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पब्लिक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पेडणेकर व श्री कुसुमेश्वर महालक्ष्मी ब्रह्मवृंद उत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन मोने यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 22/Sep/2025