लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील व लांजा तालुक्याची आरोग्यवाहिनी असलेले लांजा ग्रामीण रुग्णालयाचे रूप कधी पालटणार? याकडे समस्त लांजा तालुक्याचे लक्ष लागले आहे. काम सुरू करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले असतानाही स्थलांतरित इमारतीचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट न झाल्याने अडथळा निर्माण झाला होता. अखेर कामकाज स्थलांतर झाल्याने रुग्णालयाची जुनी इमारत पाडण्यात आली आहे.
निविदा प्रक्रिया होऊन एक वर्ष लोटले तरी नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे सेफ्टी ऑडिट न झाल्याने लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या नूतनीकरणाला ऑडिटचा अडसर ठरत होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी नवीन इमारतीचे काम ३१ जुलैपासून करण्याचे आदेश दिले होते. नव्या इमारतीसाठी १२ कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया होऊन वर्ष उलटले आहे.
स्थलांतरित होणाऱ्या जागेचे म्हणजेच सांस्कृतिक भवन या इमारतीचे ‘फायर सेफ्टी ऑडिट’ तसेच रुग्णालयातील वैद्यकीय विद्युत उपकरणांचे ‘इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट’ झाले नव्हते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज स्थलांतरित करण्यास विलंब झाला. पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथील जनता दरबारात ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत काम दिरंगाईबाबत संबंधितांना धारेवर धरले होते. जुनी इमारत पाडा आणि प्रस्तावित इमारतीत रुग्णालयाचे कामकाज सुरू करावे, असे आदेश दिले होते; मात्र त्यानंतरही उशीर होत असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या रखडलेल्या कामाबाबत लांजा शहर समन्वय समितीच्या वतीने लांजा तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले होते. यासह ग्रामीण रुग्णालयाच्या कामाबाबत प्रसारमाध्यमांनीही आवाज उठविल्यामुळे सांस्कृतिक भवन इमारतीमध्ये कामकाज स्थलांतर झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 22/Oct/2024














