Maharashtra Rain Update: राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात नवरात्रोत्सवाच्या काळात राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विशेषतः कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 26 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व व उत्तर पूर्व भागापासून ते म्यानमार-बांगलादेशच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा 25 सप्टेंबर रोजी तयार होणार आहे. यामुळे दक्षिण उत्तर प्रदेशापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम राहणार आहे. म्हणून राज्यात सर्वत्र रविवरापासून पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील. या हवेच्या परिस्थितीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, मुंबईत मागील काही दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे उकाडा सहन करावा लागत आहे. तापमानातही काहीशी वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३०.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील तापमान १ अंशाने अधिक नोंदले गेले.

शनिवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, खोपोली, पंढरपूर आणि जालना येथे तब्बल ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा आहे.

राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. मुंबईत ढगाळ वातावरण असून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू होता, तर मरीन ड्राईव्हसह अनेक भागात रिमझिम पावसाचा आनंद नागरिकांनी घेतला.

हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव येथे मुसळधार पावसाची शक्यता दर्शविली आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 22-09-2025