रत्नागिरी : तालुक्यातील पाली-मराठवाडी येथील बंद घर फोडून अज्ञातांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा तब्बल पावणे पाच लाखांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची ही घटना शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३५ ते ७.१५ वा. कालावधीत घडली आहे. गेल्या चार दिवसांमधील घरफोडीची ही तिसरी घटना असून या पूर्वी हातखंबा-कदमवाडी येथील दोन घरे अशाच प्रकारे फोडून लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. घरफोडीच्या घटना पुन्हा सूरु झाल्याने ग्रामीण पोलिसांसमोर संशयितांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
या बाबत रमेश मधुकर सावंत (५६, रा. पाली- मराठवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी मधुकर सावंत आपल्या कुटुंबियांसह बाहेर गेले असताना अज्ञाताने त्यांच्या घराच्या मागील बाजूच सिमेंटचा दरवाजा फोडला. त्या नंतर घरात प्रवेश करुन बेडरुममध्ये असलेल्या लोखंडी गोदरेजच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेली. त्यामध्ये २९ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ४० ग्रॅमच्या ६५० मिलीच्या सोन्याच्या बांगड्या, ८ ग्रॅम ५५० मिली वजनाची चेन, १ ग्रॅम ७०० मिलीचे सोन्याचे डूल, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, १ ग्रॅम वजनाची सोन्याची कानवेल, ४ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे २ टॉप, २ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि रोख ३ हजार ५०० रुपये असा एकूण ४ लाख ८८ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 22/Sep/2025














