गुहागर : गुहागर तहसीलदार परिक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडा सुरू करण्यात आला आहे. यासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी अध्यक्ष, तहसीलदार सदस्य सचिव तर सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, पोलिस निरीक्षक यांचा सामावेश आहे.
या सेवा पंधरवड्यात महसूल व वन विभाग शासन निर्णय २९ ऑगस्ट नुसार ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग, शेत पाणंद रस्त्याचे अभिलेख अद्ययावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवून रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
महसूल विभागाने गावात उपलब्ध सर्व शेतरस्त्यांना विशिष्ट सांकेतांक देण्यात येणार आहे. तसेच नव्याने तयार करण्यात आलेला गाव नमुना १-फ तयार केला जाणार आहे. अतिक्रमण प्रकरणात रस्ता अदालतीचे आयोजन करून अतिक्रमणने निष्कासित केली जाणार आहेत. भूमी अभिलेख विभागाकडून गाव नकाशांवर नोंद नसलेल्या रस्त्यांची मोजणी करणेत येवून रस्त्यांचे जीओ रेफरन्सींग करणे, सीमांकन व हद्दीचे सिमा चिन्ह स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागातर्फे शिवार फेरीत ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामविकास अधिकारी सहभागी होतील व रस्त्यांच्या प्रस्तावांबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामसभा ठराव करण्यात येतील. पोलिस विभागाकडून अतिक्रमित रस्त्यांवरील दर करणेसाठी पोलिस संरक्षण देणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात गुहागरातील सन २०११ पूर्वीचे रहिवास प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांची यादी तयार करण्यात येवून अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करण्याबाबत व पट्टे वाटपाबाबत कार्यवाही होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत.
तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी आवश्यक दाखले वाटप करणार आहेत. कातकरी कॅम्प, शाळा तिथे दाखला, आयुष्मान भारत कार्ड काढणे, सेवा विषयक बाबी पूर्ण करणे, महसूल अदालत घेणे, आजी-माजी सैनिक प्रस्ताव, कुळकायदा कलम ४३ ची अट कमी करणे, हे उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार परिक्षित पाटील यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 22/Sep/2025














