Ratnagiri : वार्‍यामुळे मासेमारी संध्याकाळपर्यंतच!

रत्नागिरी : समुद्रात रात्रीच्या वेळी वारा असल्याने पर्ससीन नेट मच्छीमार नौका पहाटे समुद्रात जाऊन संध्याकाळपर्यंत मिरकरवाडा बंदरात परतत आहेत. इतरवेळी समुद्रातील वातावरण शांत असते, तेव्हा एक दिवसापेक्षा अधिक दिवस मासेमारी करून नौका बंदरात परतत असतात. पर्ससीन नेट नौकाना सध्या बांगडा आणि म्हाकूळ चांगल्या प्रमाणात मिळत असल्याने मच्छीमारांमध्ये खुशीचे वातावरण आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर ते पर्ससीन नेट नौकांच्या मासेमारीसाठी सुपरिचित आहे. ही मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरू झाली असली, तरी गेल्या 20 दिवसांतील 10 दिवस समुद्र खवळलेला असल्याने पर्ससीनसह इतर मासेमारीसाठी अनुकूल नव्हता. मुसळधार पावसासह समुद्र खवळलेला आणि उंच लाटा उसळत असल्याने मासेमारीचे दहा दिवस वाया गेले आहेत.

एकीकडे पर्ससीन नेट नौकांचे मासेमारीचे दिवस गेले असतानाच आता वातावरण शांत झाले आहे. हवामान स्वच्छ आणि ऊन पडत असले, तरी रात्रीच्या वेळी समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे समुद्रात होणारी अनेक दिवसांची सलग मासेमारी थांबली आहे. पहाटे समुद्रात जाऊन संध्याकाळपर्यंत नौका बंदरात परतत असल्याचेही मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. त्याचवेळी बांगडा आणि म्हाकूळचा रिपोर्ट चांगला असल्याचेही मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 22-09-2025