रत्नागिरी : येथील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून आजअखेर जिल्ह्यातील ४० रुग्णांना ३० लाख ५५ हजार रुपयांची मदत झाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसाहाय्य वितरीत करणे या दोन्ही प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहेत. नागरिकांची सोय लक्षात घेऊन अर्ज प्रक्रिया अधिक सुलभकरण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामुळे अर्जदारांना मंत्रालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. जिल्हास्तरीय समिती ही स्थानिक पातळीवरच्या गरजा आणि अर्जदारांना तत्काळ मदत देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची प्रमुख कार्ये जिल्ह्यातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठीचे अर्ज स्वीकारणे, अर्जाची प्राथमिक पडताळणी करणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तपासणे, लहान किंवा कमी गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रकरणांमध्ये त्वरित निर्णय घेऊन निधी मंजूर करणे, आवश्यकतेनुसार अर्ज राज्यस्तरीय समितीकडे शिफारशीसाठी पाठवणे, रुग्णालयांशी समन्वय साधणे आणि उपचारांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे, स्थानिक गरजू रुग्णांना निधी योजनेची माहिती देणे आणि अर्ज भरण्यास मदत करणे, मदत कोणत्या आजारांवर मिळते, कॉकलियर इम्प्लांट/अंतस्त कर्ण रोपण शस्त्रक्रिया, वय वर्षे २ ते ६, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मुत्रपिंड प्रत्यारोपण, फुप्फुस प्रत्यारोपण, अस्थीमज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशुचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात/विद्युत जळीत रुग्ण सेवा देणे ही आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 22/Sep/2025














