चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. संपूर्ण जग पाहण्याकरिता उपयोगी असणारे डोळे नेत्रतज्ज्ञांच्या अथक प्रयत्नानंतर बुब्बुळ प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाली. ही शत्रक्रिया रुग्णावर महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत झाली असल्याची माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी दिली.
वालावलकर रुग्णालयातील आयसीयूमधील एका रुग्णाचे ३ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्याच्या नातेवाईकांनी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. हे समजताच तत्काळ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. प्रियांका पाटील व त्यांचे सहकारी यांनी त्या रुग्णाचे दोन्ही डोळे नेत्रदानाकरिता स्वीकारले. यानंतर सर्व गरजवंत अंध असलेल्या रुग्णांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्यात आला. त्यापैकी एक रुग्ण शस्त्रक्रिया करण्याकरिता सहमत झाला. हा पेशंट बऱ्याच वर्षांपासून अंध होता. त्याच्या डाव्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी मार लागल्यामुळे समोरील दृष्टिपटल म्हणजेच कॉर्निया हा पांढरा पडला होता. तो पारदर्शक राहिला नव्हता. त्यामुळे रुग्णाला काहीही दिसत नव्हते. तसेच पेशंटला मोतीबिंदूही झाला होता. तो मोतीबिंदू पिकून फुटण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे या बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसोबतच मोतीबिंदचीही शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते.
११ सप्टेंबर रोजी ही गुंतागुंतीची आणि अवघड अशा प्रकारची शस्त्रक्रिया अत्यंत अनुभवी नेत्रशल्यचिकित्सक डॉ. मनीषा वाघमारे यांनी यशस्वीरित्या केल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. नेत्रशल्यचिकित्सक डॉ. सागर पाटील व डॉ. भूषण इंगवले यांनी त्यांना सहकार्य केले. भूलतज्ज्ञ डॉ. लीना व त्यांचे इतर सहकारी यांनी पेशंटला भूल देण्याचे काम केले.
नेत्रदान करताना नातेवाईकांनी काय करायला हवे ?
मृताचे डोळे अर्धवट मिटलेले असतील तर ते पूर्ण बंद करावेत. डोळे कोरडे पडू नये यासाठी त्याच्यावरती थंड पाण्याची पट्टी ठेवावी. मृताचे डोके थोडेसे उंच करून उशीवर ठेवावे. खोलीतील पंखे बंद ठेवावे. मृत्यूनंतर आपल्या फॅमिली डॉक्टरकडून मृत्यूचे प्रमाणपत्र घ्यावे त्यानंतर ताबडतोब जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 22/Sep/2025














