चिपळूण : तालुक्यातील काही ओढे व नदी-नाल्यांच्या काठावरील तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी असणाऱ्या भातशेतीत निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान होण्याची संभावना नाकारता येत नाही. ही कीड गर्द निळ्या रंगाची असून तिची अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते. अळी अवस्था व प्रौढ अवस्था या दोन्ही हानिकारक आहेत. ही कीड पानाचा हिरवा भाग खरवडून खाते, परिणामी पानांवर पांढरे डाग दिसतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास भात पिकाची वाढ खुंटते. या किडीचा प्रसार विशेषतः पाणथळ जमिनीत तसेच नत्र खताचा अवाजवी वापर झाल्यास अधिक प्रमाणात होतो. भात कापणीनंतर ही कीड बांधावरील गवतावर व भाताच्या फुटव्यांवर उपजीविका करते आणि पुढील हंगामात भात पिकास उपद्रव देते.
किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची उपाययोजनाः
भात लावणीनंतर बांध स्वच्छ ठेवावेत. सतत प्रादुर्भाव असलेल्या पाणथळ भागात कापणीनंतर शेताची नांगरट करून धस्कटे काढून टाकावीत. जमिनीत पाणी जास्त काळ साचणार नाही, यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. रासायनिक नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात क्विनॉलफॉस २५ टक्के २००० मि.ली. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रिन ५ टक्के २५० मि.ली. यापैकी एक कीटकनाशक मिसळून फवारणी करावी. शेतकरी बांधवांनी वेळेत योग्य उपाययोजना करून किडीचा प्रसार आटोक्यात आणावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावाच्या सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयशी संपर्क करावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 22/Sep/2025














