Sahitya Sammelan : रत्नागिरीत 22 नोव्हेंबरला रंगणार जिल्हा साहित्य संमेलन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राज्यभरात जिल्हा साहित्य संमेलने आयोजित करण्यात येणार असून याअंतर्गत रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा बहुमान नवनिर्माण शिक्षणसंस्थेला मिळाला आहे. कोमसाप रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्यप्रेमी यांच्या सहकार्यातून हे संमेलन 22 नोव्हेंबर रोजी एस पी हेगशेट्ये महाविद्यालय एमआयडीसी येथे होणार आहे. त्यानिमित्ताने अनेक ज्येष्ठ साहित्यिकांची मांदियाळी रत्नागिरीमध्ये असणार आहे.

या संमेलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी नुकतीच राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या उपस्थितीत बैठक शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे पार पडली. या बैठकीत डॉ. ढवळ यांनी हे संमेलन युवक केंद्रीत बनवून युवकांना जास्तीत जास्त सहभागी करून घ्यावे व हे साहित्य संमेलन राज्यातील एक मॉडेल बनवावे असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीत नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, प्रा. सुहास बारटक्के, कोमसापचे केंद्रीय सचिव माधव अंकलके, संजय वैशंपायन, प्रा. संदीप कांबळे, युयुत्सु आर्ते यांच्यासह कोमसाप चे पदाधिकारी व रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्यिक उपस्थित होते. हे साहित्य संमेलन कसे असावे, याचे मार्गदर्शन डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले. एकदिवसीय संमेलन युवावर्गाला जोडून घ्यावे, त्यांच्यासाठी विविध स्पर्धा, काव्यवाचन, परिसंवादाचे आयोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या, जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी परिसंवाद, काव्यवाचन यांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना हे साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार सर्वांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 22/Sep/2025