Chiplun : नवरात्रोत्सवानिमित्त चिपळुणातील महिलांसाठी ‘नवदुर्गा दर्शन’

अडरे : चिपळूण शहरातील युवती, महिलांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त खास मोफत नवदुर्गा दर्शन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवात नऊ दिवस चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत शहर व परिसरातील भगिनींना नऊ प्रमुख देवस्थानांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

या यात्रेद्वारे श्री सुकाईदेवी (पाग), शारदादेवी (तुरंबव), भवानीआई (टेरख), महाकाली (कुंभार्ली), आई सुकाई (खडपोली), रामवरदायनी मंदिर (दादर), झोलाई मंदिर (वालोपे), करंजेश्वरी (गोवळकोट) आणि महालक्ष्मीदेवी (मिरजोळी) अशा देवस्थानांचे दर्शन होणार आहे. यात महालक्ष्मी, करजेश्वरी, रामवरदायनी व शारदादेवी या कोकणातील महत्त्वाच्या नवदुर्गा स्थळांना विशेष दर्शन घडवले जाणार आहे. चिपळूण शहराच्या प्रत्येक विभागातून गाड्या सोडल्या जाणार आहेत. दररोज किमान २० गाड्या धावतील, असा अंदाज आहे.

या यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला भगिनी व युवतींनी आपली नावे आपल्या भागातील शिंदेसेनेच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांकडे नोंदवावीत. तसेच अधिक माहितीसाठी उमेश सकपाळ यांच्या डीबीजे कॉलेज शेजारी असलेल्या माउली संपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महिलांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात नवदुर्गाचे दर्शन घडावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला हा आध्यात्मिक व सामाजिक अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरेल. -उमेश सकपाळ, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 22/Sep/2025