Rajapur: तुळसुंदे येथे किंजळादेवीचा शारदीय नवरात्रौत्सव, विविध कार्यक्रमांची रेलचेल

राजापूर, रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथे यंदाच्या वर्षीचा श्री किंजळादेवीचा शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री किंजळादेवी नवरात्रौत्सव मंडळ, महिला मंडळ आणि युवा मंडळ तुळसुंदे यांच्या वतीने आयोजित हा 27 वा उत्सव सोमवार, २२ सप्टेंबर ते गुरुवार, २ ऑक्टोबर या कालावधीत साजरा होईल.

या उत्सवादरम्यान विविध धार्मिक, सामाजिक आणि मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये दररोज विविध भक्त आणि भजन मंडळांचे भजन संध्या कार्यक्रम, रात्री दांडिया गरबा, तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक फाउंडेशन, रत्नागिरी-राजापूर यांच्या तर्फे इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप आणि शैक्षणिक मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मनोरंजनासाठी किंजळादेवी प्रीमियर लीग भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा, स्वामी समर्थ रंगभूमी रत्नागिरी प्रस्तुत ‘पारु प्रेग्नंट आहे’ हे विनोदी नाटक आणि गुरुमाऊली नृत्य झंकार लोकरेवाडी, पूर्णगड यांचा ‘डान्स धमाका’ हे कार्यक्रम होणार आहेत. तसेच, किंजळादेवी महिला मंडळाकडून हळदीकुंकू सोहळा आणि एक भव्य लकी ड्रॉ सोडत आयोजित करण्यात आली आहे.

उत्सवाच्या सांगतेनिमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, तर विसर्जन दिवशी भंडारा महाप्रसाद होणार आहे. या उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:43 22-09-2025