रत्नागिरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने सोमवारी मारूती मंदिर येथून श्री दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला.
सुरवातीला बांधकाम व्यावसायिक संतोष तावडे यांच्या हस्ते श्री शिवछत्रपतींची पूजा करून आणि श्रीफळ वाढवून ध्वजाला पुष्पहार घालण्यात आला.
दौड मारूतीमंदिर, माळनाका मार्गावरून के. सी. जैननगर येथील श्री व्याघ्रेश्वरी अंबामाता मंदिरात पोहोचली. दुर्गामाता दौड विजयादशमीपर्यंत शहराच्या विविध भागात मार्गक्रमण करणार आहे. २८ सप्टेंबरपर्यंत दररोज पहाटे ५.४५ वाजता मारूती मंदिर सर्कल, शिवतीर्थ एकत्र यावे, असे आवाहन केले आहे.
२३ सप्टेंबरला महापुरुष मित्रमंडळ, क्रांतीनगर नवरात्रोत्सव मंडळ, २४ सप्टेंबरला महापुरुष बालमित्रमंडळ, पोलिस महापुरुष तरुण मित्रमंडळ, २५ला विश्वनगर मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेण्यात येईल. २६ला आई माऊली मित्रमंडळ, २७ला थिबा पॅलेस रोड मित्रमंडळ आणि २८ला श्री नवलाई देवीमंदिरात दौड काढण्यात येईल. दुर्गामाता दौडच्या दुसऱ्या टप्प्यात २९ सप्टेंबरला तेलीआळी नाका पाराजवळून श्री जोगेश्वरी मंदिर, ३० ला जयभैरव नवरात्रोत्सव मंडळ, तेलीआळी मंडळ, १ ऑक्टोबरला राधाकृष्ण मंदिर, नवलाई मंदिरात दौड काढण्यात येईल. २ ऑक्टोबरला मारूती मंदिर येथून दुचाकीवरून मांडवीरोड, किल्ला व तिथून दौड किल्ले रत्नदुर्ग येथील श्री भगवती मंदिरात पोहोचेल.
दुर्गामाता दौडमध्ये शहरातील युवक, महिला आणि नागरिकांचा मोठा सहभाग होता. दुर्गामाता आणि देशभक्तीपर गीतांवर, घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या दौडमध्ये आणि दौडमार्गात भगव्या ध्वजाचे औक्षण करण्यासाठी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी संघटनेच्यावतीने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 23-09-2025














