Dapoli: चरस तस्करीप्रकरणी तरुण पोलिसांच्या जाळ्यात

दापोली : तालुक्यातील एक तरुण चरस तस्करीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. मसुद बदुद्दीन ऐनरकर (२९, रा. अपनानगर, खोंडा-दापोली) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १ किलो १०६ ग्रॅम चरस व इतर वस्तूंसह एकूण १ कोटी १० लाख ८० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अंमली पदार्थ तस्करीविषयी गुप्त माहिती पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात हावरे सिटीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचण्यात आला. मसुद ऐनरकर रत्नागिरी जिल्ह्यातून ठाण्याकडे तस्करीसाठी चरस घेऊन येत असताना पोलिसांनी झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला चरस सापडला. चरस हा अंमली पदार्थ सहसा विदेशातून भारतात तस्करी करून आणला जातो. त्यामुळे या प्रकरणाच्या मागे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मसुदने हा चरस कोणाकडून आणला आणि पुढे कोणाला विक्रीसाठी देणार होता, याचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मसुद ऐनरकर याला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील, अंमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे हे करीत आहेत. आंतरराष्ट्रीय रॅकेटशी त्याचे संबंध असल्यास मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 23-09-2025