Ratangiri : ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ प्रलंबित मागण्यांबाबत आक्रमक

रत्नागिरी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने दि. 8 सप्टेंबरपासून गेले आठ दिवस जिल्हाधिकारी राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी हुतात्मा स्मारक ते जिल्हा परिषद कार्यालय, असा भव्य मोर्चा काढून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. दरम्यान, याप्रश्नी तोडगा न निघाल्यास नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार असल्याचा निर्धार महासंघाने केला असल्याची माहिती ग्रा. पं. कर्मचारी महासंघाचे रत्नागिरी जिल्हा सचिव सुदेश हडकर यांनी दिली.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन अनुदान दरमहा वेळेवर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यावर जमा करावे. किमान वेतन सल्लागार समितीने तातडीने सुधारीत किमान वेतन दर जाहीर करावे. अभय यावलकर समिती अहवालानुसार वेतन श्रेणी लागू करावी. दीपक म्हैसेकर समिती अहवालानुसार पेन्शन लागू करावी. ग्रामपंचायतीचे उत्पन्न, वसुली अशा जाचक अटी रद्द करुन किमान वेतनावर १०० टक्के अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांबाबत महासंघ आग्रही आहे.

महासंघाच्या शिष्टमंडळाला राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी मंत्रालय मुंबई येथे लवकरच बैठक लावून मागण्यांबाबत योग्य तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सुरु असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र मागण्यांबाबत शासनाकडून काहीही कार्यवाही न झाल्यास दसरा, दिवाळीनंतर पुन्हा नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे हडकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 23/Sep/2025