Chiplun : चिपळूण नगर परिषद ‘त्या’ कदंब वृक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करणार

चिपळूण : एल टाईप शॉपिंग सेंटरनजीक असलेल्या झाडाचा संरक्षक कठडा तुटलेला आहे. मुळासहीत झाडाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे झाड कोसळू नये म्हणून फांद्या तोडण्यात आल्या. मात्र भविष्यात या झाडाला धोका निर्माण होऊ नये याचा विचार करून झाडासभोवतीचा संरक्षक कठडा अधिक मजबूत करण्यासाठी मातीचा भराव टाकला जाईल आणि हे झाड वाचविण्यासाठी नगर पालिकेचा उद्यान विभाग कसोशीने जोरदार प्रयत्न करील, असे नगर परिषदेचे उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर यांनी बोलताना सांगितले.

तसेच तोडलेल्या झाडाच्या शेंड्यावर प्लास्टीक बांधून आवश्यक ती उपाययोजना केली जाईल. नगर परिषद मालकीच्या एल टाईप स्व. बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटरच्या पटांगणात बहरलेला कदंब वृक्ष न.प. कडून छाटण्यात आला. यावर पर्यावरप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला.

याबाबत स्पष्टीकरण देताना उद्यान विभागप्रमुख साडविलकर यांनी पुढे सांगितले की, हे कदंबचे झाड पूर्णतः तोडायचे नव्हते. मात्र ते झाड इमारतीच्या उंचीपेक्षा जास्त वाढून इमारतीच्या पत्र्याजवळ या झाडाच्या मोठ्या फांद्या पोहोचल्या होत्या. या इमारतीमध्ये नगर परिषदेच्या परवानगीने सामाजिक उपक्रम सुरू आहेत. यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे. परिसरात लहान मुले खेळत असतात. त्यामुळे तुटून दुर्घटना घडू नये याची काळजी घेण्याच्या उद्देशाने या फांद्या छाटण्यात आल्याचे नगर पालिकेकडून आत्ता सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 23/Sep/2025