Sangameshwar : माखजन-करजुवे रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

आरवली : अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे माखजन करजुवे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. गौण खनिजाची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरवस्था अधिक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

संगमेश्वर तालुक्यातील माखजन-धामापूर दरम्यान पावसाळ्यापूर्वी वाळू वाहतूक सुरु होती. आता पावसाळ्यातही शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसात महसूल खात्याचे नियम, कायदे धाब्यावर बसवून वाळू खाडीतून काढण्यात येत आहे. या काढलेल्या वाळूची वाहतूक अवजड वाहनांनी करण्यात येत आहे. पावसाळ्यात रस्ता आणि साईडपट्टी खचून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून पूर्ण रस्ता खड्डेमय बनला आहे. या रस्त्यावरून वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे, तर प्रवाशांचे कंबरडे मोडत आहे.

वाळू आदी गौण खनिजची बेकायदा वाहतूक सुरु असताना महसूल विभाग मात्र याकडे लक्ष का देत नाही? असा सवाल जागरूक जनतेकडून विचारण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 23/Sep/2025