रत्नागिरी : एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये नोकर भरतीच्या प्रस्तावास अखेर हिरवा कंदील मिळाला असून राज्यात १७ हजार ४५० पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. पुढील महिन्यात २ ऑक्टोबरपासून निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एसटीच्या ९४० हून अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त जागेवर चालक वाहक व अन्य पदांची भरती होणार असून रिक्तपदांची माहिती काढण्याचे काम रत्नागिरी विभाग करीत आहे. पदभरतीमध्ये कोकणातील बेरोजगार भूमिपुत्रांना संधी मिळणार असल्यामुळे युवकांकडून तयारी सुरू झाली आहे.
पूर्वी एसटीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून एसटीतील नोकर भरतीला २०२४ पर्यंत उच्च न्यायालयाने मनाई केली होती. येत्या काही वर्षांत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच विविध ८ हजारांहून अधिक नवीन बसेस राज्यात येणार आहेत. त्यामुळे चालक, वाहकासह अन्य पदे रिक्त होणार आहेत. याचा विचार करून राज्य महामंडळाने नोकरभरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे दिला होता. अखेर त्याला मंजुरी मिळाली असून राज्यात १७ हजार ४५० जागेसाठी नोकरभरती होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, रत्नागिरी विभागात ९४० पदे रिक्त असून त्यामध्ये चालक वाहकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागाकडून वेळोवेळी रिक्त जागांसंदर्भात प्रस्ताब महामंडळास पाठवला आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्याने पदे भरण्यात येणार आहे. नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे नव्याने होणाऱ्या भरतीमुळे कोकणातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे.
शिकाऊ उमेदवार भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध…
शिकाऊ उमेदवारी भरतीकरिता यांत्रिक डिझेल ११०, यांत्रिक मोटारगाडी ११०, वीजतंत्री ६०, पत्राकारागीर ४४, सांधाता २५, कातारी १०, यंत्र कारागीर १०, रेफिजरेशन अँड एयर कंडीशनिंग ५, साठा जोडारी ४४, सुतार ४, रंगारी १०, शिवणकाम २३. ४५० जागांसाठी जाहिरात प्रसिध्द झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एसटीकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी विभागात विविध पदे रिक्त आहेत. आगारनिहाय पदे किती आहेत. याची माहिती काढण्यास सुरूवात झाली आहे. रिक्त जागांची माहिती एकत्रित झाल्यानंतर तो प्रस्ताव महामंडळास पाठवण्यात येईल. पहिल्या टप्प्यात किती जागा भरणार, एकूण जागेपैकी १०० टक्के जागा भरणार की अर्धे भरणार, हे अद्याप निश्चित झाले नाही-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
इतर कर्मचाऱ्यांचा भार होणार कमी
रत्नागिरी विभागात कमी मनुष्यबळात कामकाज सुरू आहे. चालक-वाहकांची संख्या कमी असल्यामुळे एकावरच तीन शिफ्ट कराव्या लागत आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांवर भार वाढला आहे. एसटी कर्मचारी, चालक-वाहकासह इतर पदे भरल्यास इतर कर्मचारी, चालक-वाहकांचा भार कमी होणार, तसेच प्रवाशांना सुरक्षित तसेच दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होणार आहे, एवढं मात्र निश्चित.
रत्नागिरी विभागात ही पदे आहेत रिक्त
चालक, वाहक-५४५ लिपिक-५० यांत्रिक-३२० वाहतूक नियंत्रक-२५ एकूण-९४०
३० हजार रुपये वेतन, प्रशिक्षण मिळणार
एसटी महामंडळात विविध जागांसाठी नोकरभरती होणार आहे. भरतीत निवड झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मासिक किमान ३० हजार रूपये वेतन देण्यात येणार असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 23/Sep/2025














