Ratnagiri : कोतवडे येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका

रत्नागिरी : दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे, बौद्धवाडी येथील एका सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने तात्काळ कार्यवाही करत यशस्वी सुटका केली. पहाटे ७:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

कोतवडे गावचे सरपंच श्री. संतोष बारगोडे यांनी विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वनपाल, पाली यांना दिली. ही विहीर ग्रामपंचायत घर नंबर ४२२ च्या मागील बाजूस भर वस्तीमध्ये असून, ती १० फूट लांब, ४ फूट रुंद आणि ४० फूट खोल आहे. बिबट्या पाण्याच्या पातळीवर (सुमारे १०-१२ फूट) असलेल्या पायरीवर बसलेला होता.

माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवण्यात आले. रेस्क्यू टीम, पिंजरा आणि इतर आवश्यक साहित्यासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पिंजऱ्याला दोन्ऱ्या बांधून तो विहिरीत सुरक्षितपणे सोडला. केवळ १५ मिनिटांतच बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षितपणे पकडला गेला.

पकडलेल्या बिबट्याची तपासणी पशुधन विकास अधिकारी, कोतवडे, श्री. अभिजीत भगवान कसाळकर यांनी केली. वैद्यकीय तपासणीत तो सुस्थितीत असल्याचे दिसून आले. हा बिबट्या नर जातीचा असून, त्याचे वय अंदाजे ९ ते १० वर्षे आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज आहे.

सदर कार्यवाही विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी-चिपळूण, श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रकाश सुतार, वनपाल पाली श्री. न्हानू गावडे, वनरक्षक श्री. विराज संसारे, श्रीमती शर्वरी कदम आणि इतर कर्मचारी (शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे) यांनी मोलाची मदत केली.

या बचावकार्यासाठी पोलीस अधिकारी मनोज पावसकर, श्री. वाडकर), होमगार्ड मनोज मोहिते), सरपंच संतोष बारगोडे, उपसरपंच स्वप्नील प्रकाश पड्याळ, पोलीस पाटील सौ. पूर्वा पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ. वैष्णवी माने, सौ. दीया कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र हरी कांबळे आणि इतर ग्रामस्थ अनंत तुकाराम फणसोपकर, मयुरेश मंगेश कांबळे, सुनील गोपाळ कांबळे, सुहास मोहिते, साहिल कांबळे यांचे सहकार्य लाभले.

वन अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. बिबट्या सुस्थितीत असल्यामुळे त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. अशा घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 23/Sep/2025