Ratnagiri: सुरक्षित रत्नागिरी किनारा : पोलीस अधीक्षकांकडून मच्छीमारांशी थेट संवाद

रत्नागिरी : रत्नागिरी किनार्‍यावरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी 22 सप्टेंबर 2025 रोजी मिरकरवाडा जेट्टीला भेट दिली. या भेटीत त्यांनी स्थानिक मच्छीमार आणि नेपाळी खलाशी यांच्याशी थेट संवाद साधला आणि किनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान, पोलीस अधीक्षक बगाटे यांनी मिरकरवाडा येथील बोटींची तपासणी केली. तसेच, त्यांनी स्वतः पोलीस दलाच्या नौका विभागाच्या जवानांसोबत सागरी गस्त घालून समुद्र किनाऱ्याची पाहणी केली. या गस्तीदरम्यान, त्यांनी किनारी भागातील संभाव्य धोके आणि सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेतली.

या प्रसंगी पोलीस अधीक्षक बगाटे यांनी किनारपट्टीवरील अवैध हालचाली रोखण्यासाठी पोलीस दल आणि स्थानिक मच्छीमार यांच्यात योग्य समन्वय असणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. त्यांनी मच्छीमारांना आवाहन केले की, समुद्रात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावे. या उपक्रमामुळे रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्याची सुरक्षा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

या वेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती. राधिका फडके, पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक श्री. नितीन भोईर आणि नौका विभागाचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 23-09-2025