गुहागर : तालुक्यातील हेदवी-हेदवतड मोरेवाडी येथे घरकुल योजनेच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीला गंभीर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पीडिताचे दोन्ही हात आणि एक पाय मोडले असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी एकनाथ गोविंद मोरे (वय ५५) हे २० सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता घरी एकटे असताना, त्यांच्या चुलत भावाने रामचंद्र महादेव मोरे आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेने त्यांना घराबाहेर बोलावून शिवीगाळ केली. घरकुल योजनेला विरोध केल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्यावर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ‘तुला ठार मारून टाकतो’ अशी धमकीही दिली, असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
या हल्ल्यात फिर्यादीचे दोन्ही हातांची हाडे व डाव्या पायाचे हाड मोडले, तसेच उजव्या पायाला व डोळ्याच्या भुवईवर गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर जखमी अवस्थेत त्यांनी थेट गुहागर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११८(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 23/Sep/2025














