Sangameshwar : असुर्डे- चाळकेवाडी रस्त्यावर बिबट्याच्या बछड्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असुर्डे ते चाळकेवाडी या मुख्य रस्त्यावर ढोलेवाडीजवळ एका बिबट्याच्या बछड्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सकाळी ८ वाजता असुर्डे गावाचे पोलीस पाटील श्री. सुभाष गुरव यांनी वन विभागाला फोन करून रस्त्यावर बिबट्याचा मृत बछडा पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांनी तात्काळ आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. तपासणी केली असता, रस्त्याच्या उजव्या बाजूला निपचित पडलेला हा बिबट्याचा नर बछडा असल्याचे निष्पन्न झाले. अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे त्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटली.

त्यानंतर पशुधन विकास अधिकारी, कडवई, श्री. बेलूरे यांच्याकडून मृत बछड्याचे शवविच्छेदन करण्यात आले. हा बछडा अंदाजे ५ ते ६ महिन्यांचा होता. या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. ही सर्व कार्यवाही विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी-चिपळूण, श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कार्यवाहीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रकाश सुतार, वनपाल संगमेश्वर (देवरुख) श्री. सागर गोसावी, वनरक्षक श्री. आकाश कडूकर, सहयोग कराडे, सूरज तेली, श्रीमती सुप्रिया काळे, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, पोलीस पाटील श्री. सुभाष गुरव आणि वन्यप्राणी मित्र दिनेश गुरव यांनी सहकार्य केले.

विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 23/Sep/2025