राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून गोवंश वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत १३ गोवंश गुरांची सुटका करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक २२ सप्टेंबर २०२५ रोजी लांजा उपविभागात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचल ते जवळेथर रोडने गगनबावडा घाटमार्गे अवैधपणे गोवंश वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने पाचल येथे वाहनांची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान, त्यांना टाटा कंपनीचे (क्र. MH-08-AP-0254) वाहन दिसले. त्याची तपासणी केली असता, वाहनाच्या हौद्यात १३ गोवंश जनावरे दाटीवाटीने बांधलेली आढळली. या जनावरांना पाणी आणि खाद्य न देता, त्यांना वेदना होतील अशा पद्धतीने बांधून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाले.
चालकाकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे गोवंश वाहतुकीचा परवाना नव्हता. त्याने आपली नावे १) सलमान मुस्ताक बलबले (वय ३५, रा. बलबले मोहल्ला, राजापूर) आणि २) संजय दत्तराम पाटणकर (वय ४८, रा. कुंभवडे रामणवाडी, राजापूर) अशी सांगितली. त्यांनी ही जनावरे तळगाव कोंडे येथील काजी मोहम्मद उर्फ पांड्या यांच्याकडून आणल्याचे सांगितले.
या प्रकरणी तिन्ही आरोपींवर राजापूर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, वाहनासह एकूण १२,०५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलीस अंमलदार सुभाष भागणे, नितीन डोमणे, श्री. पालकर, श्री. कदम आणि श्री. प्रवीण खांबे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 23/Sep/2025














