खेड येथील माजी मनसे नेते वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा लांबला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू असताना आता हा प्रवेश आणखी दोन दिवस लांबला आहे. असं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि खेडेकर शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले आहेत.
पूर्वी हा पक्षप्रवेश ४ सप्टेंबरला होणार होता, पण भाजप खासदार नारायण राणे यांच्या तब्येतीमुळे आणि मराठा व ओबीसी आरक्षणाच्या विषयामुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता पुन्हा एकदा हा प्रवेश सोहळा लांबल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना खेडेकरांनी सांगितले की, “आज प्रवेश होणार नाही हे मला माहिती होते, पण मी कोण आहे हे दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन आलो आहे.” त्यांनी भाजपचे काम सुरू केले असून, पक्षप्रवेश ही केवळ एक औपचारिकता असल्याचे स्पष्ट केले.
खेडेकर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली येथे भेट घेणार आहेत. या भेटीनंतर काही ‘गोड बातमी’ मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. काही लोक त्यांच्या प्रवेशाला विरोध करत आहेत का, असे विचारले असता, त्यांनी थेट उत्तर देणे टाळले, पण आपण भाजपमध्ये दुप्पट ताकदीने काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.














