रत्नागिरी : देवरूख येथे महसूल विभागाने कारवाई करून जप्त केलेला १९ लाखांचा ट्रक चोरीला गेला आहे. या प्रकरणी ट्रकमालक शरणबसप्पा धरमण्णा तळवार (रा. कलंहागरगा, जि.गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी लांजा-दाभोळे रस्त्यावर सुकमवाडीजवळ तळवार याचा १४ टायर ट्रक (क्र. केए-३२ डी-६१३४) जांभ्या दगडाने ओव्हरलोड भरलेल्या स्थितीत आढळला होता. महसूल विभागाने तो जप्त करून देवरूख येथील शिवाजी चौकाजवळील वडाच्या पाराजवळ पुढील कारवाईसाठी उभा केला होता.
मात्र, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते १८ सप्टेंबर दुपारी २ वाजेदरम्यान आरोपीने कोणतीही परवानगी न घेता हा ट्रक पळवून नेला. जप्त ट्रकमध्ये ५.७२ ब्रास जांभा दगड होता. त्याची किंमत १७,१६० रुपये आहे, तर ट्रकची किंमत १९ लाख रुपये आहे.
या घटनेनंतर मंडल अधिकारी विलास यशवंत हिरोळे यांनी देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 24-09-2025













