देवरुख : दोन दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरच्या राजीनाम्याचा विषय चर्चेत आला. नेमका काय प्रकार घडला, या महिला डॉक्टरांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत धामापूर तर्फे देवरूख येथील ग्रामस्थांची विशेष ग्रामसभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेत सविस्तर चर्चा होऊन ग्रामस्थांनी या महिला डॉक्टरची पाठराखण केली आणि अखेर त्या महिला डॉक्टरने राजीनामा मागे घेतला.
कर्तव्यावर वेळेत पोहोचणे, रात्रीच्या वेळेस रुग्णांना आवश्यक ती सुविधा मिळणे यासारख्या अनेक विषयांवर सामाजिक कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करत भावना दुखावल्या जातील, अशा शब्दांत संबंधित महिला डॉक्टरांशी संवाद साधला होता. यानंतर मात्र आपल्या कर्तव्यात काहीही कसूर न ठेवता रुग्णांना सेवा देण्यासाठी कायम तत्परतेने धावून जात असणाऱ्या या महिला डॉक्टरने राजीनामा देणार असल्याचे नमूद केले होते. या प्रकारामुळे गावात मोठी खळबळ उडाली, सारा गावा महिला डॉक्टरच्या पाठीशी उभे राहत तातडीची विशेष ग्रामसभा घेतली.
या बैठकीत महिला डॉक्टरांच्या भावना दुखावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला ग्रामस्थांनी चांगल्याच भाषेत समज दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याचबरोबर डॉक्टरांच्या चांगल्या कार्याचे कौतुक ग्रामस्थांनी केले. गरिबांचा या वैद्यकीय सुविधेवर जोवर विश्वास आहे तोवर कुणी कितीही आगपाखड केली तरी कर्तव्यदक्ष डॉक्टरांना कसली झळ पोहोचणार नाही हे या प्रकारावरून दिसून आले.
दोन्हीकडील मुद्दे ध्यानात घेऊन बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला या आरोग्य केंद्रातील अनागोंदी सदृश्य गोष्टी ध्यानात आल्या. तर सरपंच, संबंधित समिती यांच्या ध्यानात तो विषय आणून द्यावा, व्यक्तिगत स्वरुपात कोणत्याही अधिकाऱ्याला जाब अथवा बोलणे टाळावे अशा परखड शब्दात समज देण्यात आली. या बैठकीत युयुत्सु आर्ते यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर वादावर पडदा पडला.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, डॉ. व्ही. आर. रायबोळे, डॉ. वाजे, डॉ. भुसारी, सुपरवायझर बोरसे, सतिश सप्रे, संतोष पाल्ये, महेंद्र गुरव, ताम्हाणे येथील तेज कुमार टक्के, आंबवलीचे सरपंच किरवे, सांगावे उपसरपंच विश्वास शेलार, कुडवली येथून दिनेश जाधव, अमित जाधव, धामापूर येथील प्रशांत कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष भाई पवार आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 24-09-2025












