Navaratri : तुरंबवला भाविकांची जत्रा

चिपळूण : नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठेत उलाढालीला वेग आला आहे. नारळ, खण, फुले, पूजासाहित्यांना मोठी मागणी आहे. हॉटेल व्यवसाय तेजीत आला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागांतही नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत आहे. तुरंबव येथील शादरादेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवामुळे जत्रेचे स्वरूप आले आहे. विविध प्रकारचे स्टॉल मंदिर परिसरात लावण्यात आले असून, भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

या उत्सवामुळे मंदिर असलेल्या गावातील बाजारपेठा गजबजल्या आहेत. काही गावांमध्ये मंदिराच्या देवस्थान ट्रस्टने नारळ, खण, फुले, पूजा साहित्यविक्रीची व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी खासगी स्टॉल लागले आहेत. तुरंबव येथील शारदादेवीच्या मंदिर परिसरात तब्बल नऊ दिवस यात्रा भरते. या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होते. चिपळूण व परिसरातील देवींच्या दर्शनासाठी रिक्षांची मागणी वाढली असून, अनेक रिक्षा आगाऊ आरक्षित केल्या गेल्या आहेत. यामुळे रिक्षा व्यवसायातही चैतन्य आले आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला खासगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाड्यांची ग्रुपने बुकिंग करून मंदिरांना भेटी देत आहेत. खण-नारळ, फुले, मिठाई, पूजासाहित्य, कपडे, सजावट साहित्य या वस्तूंना प्रचंड मागणी आहे.

सुवासिनींकडून देवीला खणानारळाची ओटी अर्पण करण्यासाठी मोठी लगबग दिसून येते. नारळाचे भाव ३० रुपयांच्या पुढे गेले आहेत तर खण पाच ते १० रुपयांना मिळत आहेत. प्रसादासाठी काकडीचे तुकडे वाटण्याची प्रथा असल्याने काकडीचा भाव ४० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. झेंडूची फुले, हार, पेढे, खोबरे, उदबत्ती, कापूर यांनादेखील मागणी आहे.

विंध्यवासिनी देवीच्या दर्शनासाठी राज्यातील भक्त येतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि नवस फेडण्यासाठी येणाऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून सर्व प्रकारचे साहित्य आम्ही मंदिर परिसरात उपलब्ध करून देतो. यातून काहींना रोजगारही उपलब्ध होत आहे. -शशी कुलकर्णी, विंध्यवासिनी परिसरातील विक्रेते

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 24-09-2025