Ratnagiri : चिपळुणातही ‘टीडब्ल्यूजे’वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

चिपळूण : शहरातील गुहागर बायपास रोड लगत असलेल्या टीडब्ल्यूजे असोसिएटस् कंपनीच्या प्रतिनिधींनी एका व्यक्ती आणि त्याच्या बहिणीची एकूण 28 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून, चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता अनेक गुंतवणूकदार आपली फसवणूक झाली म्हणून पुढे येत असून फसवणुकीच्या रकमेचा आकडा दिवसेंदिवस वाढणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक दिलीप माटे (वय 29, रा. कामथे, चिपळूण) यांनी 3 लाख 50 हजार रुपये आणि त्याची बहीण तृप्ती दिलीप माटे यांनी 25 लाख रुपये अशी एकूण 28 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक टीडब्ल्यूजे असोसिएटस्मध्ये केली होती. कंपनीचे सर्वेसर्वा समीर सुभाष नार्वेकर (रा. गुहागर), त्याची पत्नी सौ. नेहा नार्वेकर (रा. गुहागर), तसेच संकेश रामकृष्ण घाग (रा. चिपळूण) आणि सिद्धेश शिवाजी कदम (रा. कामथे, चिपळूण) यांनी विश्वास संपादन करून दर महिन्याला 3 ते 4 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. मात्र परतावा न मिळाल्याने अखेर प्रतीक माटे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार या चौघां विरोधात चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जानेवारी 2023 पासून सुरू झालेली ही गुंतवणूक मे 2025 नंतर परतावा न दिल्यामुळे आपली फसवणुकत झाली असे माटे यांच्या लक्षात आले.वारंवार पाठपुराव्यानंतरही मूळ रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे प्रतिक माटे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 216/2025, 18(2), 18(4) आणि 18(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, सध्या तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा आमिषपूर्ण गुंतवणुकींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

चिपळूणतील कार्यालयाला टाळे

टी. डब्ल्यू. जे. चे चिपळूण येथे गुहागर बायपास रोडलगत कार्यालय आहे इंटक कामगार संघटनेच्या इमारतीमध्ये हे कार्यालय होते. भाड्याच्या जागेत कार्यालय असताना आलिशान असे कार्पोरेट कार्यालय चालवले जात होते. मात्र गेल्या एक दोन महिन्यापासून या कार्यालयाला टाळे आहे. संबंधित इंटेक संघटनेने हे कार्यालय टी डब्ल्यू जे कडून काढून घेत आपल्या ताब्यात घेतले आहे. व त्याला टाळे ठोकले आहे. तसेच या कंपनीचे कर्मचारी, अधिकारी यांनीही चिपळूण मधून पोबारा केला आहे. त्यामुळे आता ठेवीदारांना पोलिसात तक्रार देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. तर अनेक जण आपण फसलो हे कोणाला सांगणार कसे? त्यामुळे मूग गिळून बसले आहेत.

रकमेची वसुली कशी होणार…

या कंपनीने संपूर्ण राज्यभरात आपल्या शाखा निर्माण केल्या होत्या. त्यामुळे या फसवणुकीचा आकडा कित्येक कोटीमध्ये जाणार आहे. विशेष म्हणजे कंपनीची सर्वच कार्यालय भाड्याच्या जागेत चालवली जात होती. त्यामुळे रकमेची वसुली कशी होणार हा देखील प्रश्न आहे .

उच्चभ्रू लोकांची गुंतवणूक

टीडब्ल्यूजे नॉन बँकिंग कंपनीने जास्त परताव्याचे आम्हीच दाखवून लोकांकडून लाखो, कोट्यवधीची गुंतवणूक करून घेतली. सुरुवातीच्या टप्प्यात लोकांना परतावा दिला; मात्र गेल्या आठ महिन्यांत लोकांना परतावा मिळत नसल्याने कंपनीविरोधात तीव्र नाराजी आहे. समाजातील नामवंत, सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पोलिस आणि उच्चभ्रू लोकांनी या कंपनीमध्ये आपले पैसे गुंतवले. त्यामुळे पैसे मिळतील या आशेने कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नव्हते. यवतमाळ येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अनेक जण पोलिसांत फसवणुकीची तक्रार देत आहेत. या अनुषंगाने चिपळूणमध्येदेखील गुन्हा दाखल झाला आहे. चिपळूण शाखेच्या माध्यमातून सुमारे दीडशे कोटींची गुंतवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 24-09-2025