खेड : तालुक्याला परतीच्या पावसाचा तडाखा

खेड : तालुक्याला गेले आठ दिवस परतीच्या पावसाचा तडाखा बसत आहे. तालुक्यातील सर्वच गावांत या परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान होत असून शेतकऱ्यांचे उभे असलेले भात पीक आडवे झाले आहे. त्यामुळे बळीराजा संकटात आहे. पावसाने तालुक्यातील अनेक गावात पडझड झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंचनाम्यानंतर त्याचे चित्र समोर येईल.

तालुक्यात गेले आठ दिवस दुपारपर्यंत ऊन असते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू होत आहे. सोमवारी दुपारनंतर पाऊस सुरू झाल्याने ग्रामीण भागातून शहरातील विविध कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे एसटीचे वेळापत्रकही बिघडत असल्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

शहरातील डाकबंगला येथील अल मक्का कंपाऊंड मुल्लाजी कॉलनीजवळील बंगल्याशेजारील इमारतीवर मोठे झाड पडून इमारतीच्या शेडचे नुकसान झाले. याच झाडाखाली एक मोटारसायकलही अडकली आहे. हे झाड व मोटारसायकल बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य प्रयत्न करीत आहेत. या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी संपूर्ण तालुक्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

शेतातील भातपीक अनेक ठिकाणी आडवे होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवळीही काही दिवसावर आली आहे. पण परतीच्या पावसामुळे व्यापाऱ्यांना कपडे, आकाश कंदील, पणत्या, रांगोळ्या अशा विविध वस्तूचे स्टॉल लावण्यातही मोठी अडचण येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 22/Oct/2024