रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडीला स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर साकव नसल्याने होणारी अडचण दूर झाली आहे. ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या या समस्येची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी पुलाच्या बांधकामासाठी 30 लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे.
काही दिवसांपूर्वी ‘स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही, नदीतून मृतदेह न्यावे लागतात’ अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल पालकमंत्री श्री. सामंत यांनी घेतली. आमदार शेखर निकम यांनी या पुलासाठी 30 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
पालकमंत्र्यांनी मागणीला तत्काळ प्रतिसाद देत जिल्हा वार्षिक योजनेतून हा निधी मंजूर केला. तसेच पुढील प्रशासकीय प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यासाठी हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
या निधीमुळे आता स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार होणार असून, वाणी वाडीतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 24-09-2025












