देवरूख : जनतेचे प्रश्न शोधून तिथपर्यंत पोहचले पाहिजे. माझा चांगल्या कामाला नेहमीच पाठिंबा असतो. चांगले काम करा मी नक्कीच तुमच्या पाठिशी राहिन. आपण जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे जनतेचे सेवक समजूनच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी सोमवारी देवरूख येथे पार पडलेल्या संगमेश्वर तालुक्याच्या आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांनी जनतेच्या प्रश्नांसदर्भात अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
आमसभेच्या पार्श्वभूमीवर देवरुख पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी संगमेश्वर तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी बैठकीला तालुक्यातील विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आ. शेखर निकम म्हणाले कि, केवळ आमसभेपुरते प्रश्न न सोडविता जनतेचे कायमस्वरुपी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा. बांबू लागवडीसाठी विशेष महत्व देवून जास्तीत जास्त बांबू लागवड कशी करता येईल, यादृष्ट्रीने प्रयत्न करा. देवरूख-साखरपा या रस्त्याचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे लवकरच आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाहीत, याबाबत आपल्याकडे तक्रारी आल्या असून त्यांची सर्वांची बैठक घेवून योग्य ती समज द्या, असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले.
देवरूख ग्रामीण रूग्णालयात सोनोग्राफी मशीन नसल्याचे सांगण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकारी डाँ. माने यांनी सोनोग्राफी मशीन आहे मात्र रेडिओलाँजिस्ट नसल्याचे कारण सांगितले. नगरपंचायत हद्दीतील विविध समस्यांबाबत तक्रारी आल्या असून त्या लवकर सोडवाव्यात. असे न. पं. अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, आढावा बैठकित आमदार शेखर निकम यांनी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. व आमसभेपुर्वी जनतेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकिला तहसीलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, गटशिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभुवणे, तालुका आरोग्य अधिकारी डाँ. गोविंद मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अभिजीत कांबळे आदिंसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 24-09-2025














