रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कामातील दिरंगाई आणि निकृष्ट कामामुळे झरेवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. हातखंबा ते झरेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून हातखंबा तिठा ते झरेवाडी फाट्यापर्यंतचे महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. हातखंबा हायस्कूल ते हातखंबा गुरववाडी हा २०० ते ३०० मीटरचा रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत खोदून ठेवलेला आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
याच परिसरात वारंवार अपघात घडतात १७ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५.१५ वा.च्या सुमारास हातखंबा हायस्कूलसमोर झालेल्या अपघातात १९ वर्षीय विद्यार्थी शिवम रवींद्र गोताड याचा मृत्यू झाला. या अपघातांना
संबंधित ठेकेदार, प्रशासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. निवेदनात ग्रामस्थांनी प्रामुख्याने, हातखंबा हायस्कूल ते गुरववाडी रस्त्याचे चांगल्या प्रतीचे डांबरीकरण करण्याची मागणी आहे. थांबलेले चौपदरीकरण काम एका महिन्यात युद्धपातळीवर पूर्ण करावे, याशिवाय, जिंदल कंपनीच्या ओव्हरलोड ट्रक आणि कंटेनरची बेकायदेशीर वाहतूक दिवस-रात्र सुरू असल्यामुळेही अपघात वाढत असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी, किंवा ती निवळी-बावनदी-देवरुख-साखरपा या पर्यायी मागनि वळवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. झरेवाडी बस स्टॉप ते फाट्यापर्यंतचा रस्ताही असुरक्षित असून, तो ग्रामस्थांना विश्वासात न घेता बांधला असल्याचा आरोप करण्यात आला.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनाही या निवेदनाची प्रत पाठवली आहे. यावेळी गावकर राजेश कळंबटे, उपसरपंच देवेंद्र सनगरे, पोलिस पाटील बाळकृष्ण गोताड, वसंत कळंबटे, अवधूत कळंबटे, सुभाष कळंबटे, औदुंबर कळंबटे, पंकज पाडावे, मोरेश्वर सनगरे, दिनेश तांबे, अमोल कळंबटे, एकनाथ कळंबटे आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 24-09-2025














