खेड : लोटे-घाणेकुंट परिसरात दुर्मिळ विषारी बांबू पिट वायपर (स्थानिक भाषेत चापडा) साप आढळून आला. वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत WORLD FOR NATURE या उपक्रमांतर्गत सर्पमित्र व प्राणिमीत्र ऋषिकेश चव्हाण आणि आर्यन मोहिते यांनी या सापाचे यशस्वी रेस्क्यू केले.
बांबू पिट वायपर हा विषारी आणि अतिशय दुर्मिळ प्रजातीतील साप मानला जातो. तो साधारणतः दाट जंगलामध्ये, विशेषतः आर्द्र व हिरव्यागार परिसरात आढळतो. नागरी वस्तीत आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्रांनी दक्षता घेत हा साप कोणताही अपाय न होता सुरक्षितपणे पकडला.
यानंतर त्याची अधिकृत नोंद खेड वनविभागात करण्यात आली असून, नियमानुसार त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. या प्रसंगी सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले की, ‘साप आढळल्यास घाबरून न जाता त्वरित सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा. स्वतःच्या सुरक्षेसाठी किंवा सापाच्या जीवितासाठी कोणतीही अविचारी कृती टाळावी.’
या उपक्रमामुळे केवळ एका दुर्मिळ प्रजातीचे प्राण वाचले नाहीत, तर जैवविविधतेच्या जतनासाठीही एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. स्थानिक पातळीवर सर्पमित्रांचे कौतुक होत असून त्यांचा हा प्रयत्न पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आदर्श ठरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 24-09-2025














