चिपळूण : काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमातीचे उपाध्यक्ष सुनील सावर्डेकर बंडखोरीच्या तयारीत..

चिपळूण : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जिल्ह्यामध्य राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेस प्रदाधिकारी व कार्यकत्यांना आघाडीच्या उमेदवाराचेच काम करावे लागणार आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी काँग्रेसला एकही जागा न देण्याचा निर्णय घेतल्याने २५ ऑक्टोबरला चिपळूण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमातीचे उपाध्यक्ष सुनील सावर्डेकर यांनी जाहीर केले. त्यामुळे आघाडीत मिठाचा खडा पडला आहे.

चिपळूण विधानसभा मतदार संघात अद्याप महायुती अथवा महाविकास आघाडीकडून कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांना दुसऱ्यांदा विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. आमदार निकमांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांना समर्थन देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे शरद पवार यांनी उद्योजक प्रशात यादव यांना बळ देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार यादव हे गेल्या काही महिन्यापासून दमदारपणे चिपळूण मतदार संघात जोमाने विधानसभेच पेरणी करीत आहेत.

यादव यांची अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी महाविकास आघाडीत त्यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. विधानसभेच्या या आखाड्यात जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला एकही जागा आलेली नाही. त्यामुळे कॉग्रेस पदाधिकाऱ्यांना मित्रपक्षाचेच काम करावे लागणार असल्याने कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील सावर्डेकर यांनी अपक्ष म्हणून विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला.

चिपळूण विधानसभेसाठी महाविकास आघाडीच अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. कॉग्रेस पक्षानेही येथे वेगळी भूमिका घेतलेली नाही. महाविकास आघाडीत ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यांचे आम्ही एकदिलाने प्रचाराचे काम करू. सुनील सावर्डेकर यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यांना आम्ही पाठिंबा देणार नाही. – लियाकत शाह, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 22/Oct/2024