Chiplun: श्री क्षेत्र टेरव येथील भवानी माता नवरात्रौत्सवाला दिमाखात प्रारंभ

चिपळूण : दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई मंदिरात यावर्षीही नवरात्रौत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा सोमवारी प्रारंभ झाला. अश्विन शुद्ध नवमी १ ऑक्टोबरपर्यंत पारंपरिक रूढीपरंपरेप्रमाणे धार्मिक विधी व पूजन करून नवरात्रौत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

नवरात्रौत्सवात श्री भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कालकाई व कुलस्वामिनी या देवींना वारानुसार नवरंगाच्या साड्या परिधान करून अलंकारांनी सालंकृत करण्यात येणार आहे. तसेच मंदिरास रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट करून पालखीत रुपे लावण्यात आली आहेत. या मंदिरात भवानी मातेच्या ७.५ फूट उंचीच्या अत्यंत सुंदर व अप्रतिम कृष्णशीला मूर्तीसह गणपती, वाघजाई, भूमिगत कालकाई, महालक्ष्मी, कुलस्वामिनी, महादेवाची पिंडी, भैरी, केदार तसेच नवदुर्गा आदी देवतांची स्थापना करण्यात आली आहे.

या मंदिराचे खास आकर्षण म्हणजे श्री भवानी मातेबरोबरच शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री या नवदुर्गांच्या मूर्ती सविस्तर माहितीसह स्थापित केलेल्या आहेत. भैरी-भवानी आणि नवदुर्गा असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव देवस्थान आहे.

मंदिर वरील कालावधीत दर्शनासाठी खुले राहणार असून, ओटीचे सामान मंदिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती समस्त टेरख ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 24-09-2025