Pik Pahani: ई-पीक पाहणी नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : खरीप हंगाम २०२५ साठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद ‘ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲप’ मध्ये ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.

पूर्वी या नोंदणीचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर होता. राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी या कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची नोंद बाकी राहिली होती. त्यासाठी आधी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली; मात्र अजूनही ई-पीक पाहणीची टक्केवारी कमी असल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

ई-पीक पाहणी हा शासनाचा महत्त्वाचा उपक्रम असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती स्वतः डिजीटल पद्धतीने नोंद करता येते.
यामुळे सरकारकडे पिकांची अचूक माहिती जमा होते आणि पुढील योजनांची आखणी तसेच पीकविमा, पीककर्ज, नुकसानभरपाई, शासकीय भात खरेदी-विक्री यांसाठी याचा थेट उपयोग होतो.

खरीप हंगाम २०२५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आजअखेर १० हजार ९८३ खातेदारांनी १७ हजार ३८७.१० हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी अंतर्गत नोंद केली आहे.

ई-पीक पाहणी करणे बंधनकारक असल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनीही लवकरात लवकर ‘ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲप’ मध्ये खरीप पिके तसेच फळपिकांची नोंद करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 24-09-2025