चिपळूण : चिपळूण शहरात वारंवार वीज जाण्याचा प्रकार घडत आहे. जुनी उपकरणे आणि वितरण व्यवस्थेत होणारा बिघाड, अकार्यक्षम व्यवस्थापन आणि योग्य माहिती ग्राहकांपर्यंत पोचवण्यात येणारे अपयश यामुळे चिपळूणवासीय त्रस्त झाले आहेत.
यावर तोडगा काढण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी बैठक घेतली होती. त्यानंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शहरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
शहरात सुमारे ३५ हजार ग्राहक आहेत. पाग, मुरादपूर आणि खेर्डी येथील उपकेंद्रातून चिपळूण शहराला वीजपुरवठा होतो. खेर्डी उपकेंद्रावरून होणाऱ्या वीजपुरवठ्यात अडथळा झाला तर त्या केंद्रावर अवलंबून असलेल्या ग्राहकांना पाग किंवा मुरादपूर येथील उपकेंद्रातून वीज दिली जाते. या सुधारणांसाठी महावितरण कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च केले असतानाही शहरातील ग्राहकांना अंधारात राहावे लागते.
आमदार निकम यांनी काही दिवसांपूर्वी ग्राहक आणि महावितरणचे अधिकारी यांची बैठक घेतली. त्यात नागरिकांनी काही मुद्दे मांडले होते. शहरातील जुन्या झालेल्या ट्रान्समिशन वाहिन्या, ट्रान्स्फॉर्मर आणि इतर उपकरणांमधील बिघाड तसेच वितरण जाळ्याची अपुरी क्षमता यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक फांद्या तोडण्यासाठी फेब्रुवारीपासून पुढे पेट्रोलिंग केले जाते. पावसाळ्यात विजेच्या तारावर फांदी पडून वीजपुरवठा बंद झाल्याचे कारण महावितरणकडून दिले जाते. शहरात अनेक ठिकाणी केबल, वायर, ओव्हरहेड वायर, निकृष्ट वायरचे जाळे पसरले आहेत.
ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरण कंपनी प्रयत्न करत आहे. एखादा बिघाड झाला तर त्या भागातील नागरिक महावितरणला संपर्क करतात. यापूर्वी एक संपर्क क्रमांक होता, आता चार संपर्क क्रमांक आहेत. वितरण व्यवस्थेतील सुधारणा सुरू आहेत. -प्रवीण गेडाम, कार्यकारी अभियंता, महावितरण, चिपळूण
चिपळूण शहरात दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होतो. महावितरणचे अधिकारी आणि व्यापारी यांच्यात योग्य संवाद नाही. त्यामुळे शाब्दिक चकमक होते. अधिकारी चक्क इन्व्हर्टर बसवण्याचा सल्ला देत आहेत. शहरातील मीटर दहा टक्के फास्ट आहेत. नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतरही स्मार्ट मीटर बसवण्याचा सल्ला दिला आहे. मीटर तपासणीसाठी थर्डपार्टी ऑडिटची सोय नाही. – विजय चितळे, माजी नगरसेवक, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 25-09-2025














