रत्नागिरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून राज्यभरात नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान योजना सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेचा लाभ आतापर्यंत १ हजार ६९६ जणांनी घेतला असून, त्यापैकी १२८ जणांवर शस्त्रक्रिया झाली आहे तर उर्वरित ८४३ जणांना चष्मा लागला आहे. रत्नागिरीत या अभियानाचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.
या आरोग्य अभियानातून जिल्ह्यात ३७ शिबिरे घेण्यात आली होती. अद्यापही अभियान सुरूच असून जिल्ह्यातील गरजू, गरीब रुग्ण या अभियानाचा लाभ घेत असून, आतापर्यंत दीड हजाराहून अधिक जांनी लाभ घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश तळागाळातील नागरिकांपर्यंत नेत्रसंबंधी सुविधा पोहोचवणे हा आहे. राज्यभरातील प्रत्येक गरजू नागरिकांना मोफत नेत्र उपचार मिळावेत यासाठी शासकीय यंत्रणा काम करीत असून जिल्ह्यातील तालुका व गावपातळीवर एकूण १३७ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
आजअखेर ३७ शिबिरांतून गावपातळीवरील वाड्या, वस्त्या, दुर्गम भागातील नागरिकांना तपासणी, शस्त्रक्रिया आणि चष्मा सुविधा मोफत देण्यात आले आहे.
शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थाकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. या उपक्रमात सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्वयंसेवी संस्था, नेत्र रुग्णालये, डेरवण मेडिकल कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महात्मा फुले योजना यासह विविध सामाजिक संस्था सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य अभियानातून वृद्ध, शेतकरी, मजूर, महिलांना दिलासा
नेत्ररोग उपचाराचा खर्च तळागाळातील गरजू नागरिकांसाठी जास्त असून, ही मोफत शिबिरे वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ आणि मोफत नेत्रसंबंधी उपचार मिळत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 25/Sep/2025














