Ratnagiri : जिल्ह्यात नवभारत साक्षरता चाचणीत १३ हजार ७७० सहभागी

रत्नागिरी : केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली. परीक्षेत १३ हजार ७७० जण सहभागी झाले होते. केंद्रशासन व राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२२ ते २७ या कालावधीत राबवण्यात येत आहे. १५ वर्षे व त्यापुढील असाक्षर व्यक्तींना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. २१ ला जिल्ह्यातील २ हजार ६७ केंद्रांवर चाचणी घेण्यात आली. त्यासाठी १४ हजार ६५ जणांनी नोंद केली होती. त्यापैकी १३ हजार ७७० जणांनी परीक्षा दिली. ९८ टक्के परीक्षार्थीनी सहभाग नोंदवला. रत्नागिरी जिल्ह्यासाठी यावर्षी ९ हजार ५४८ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. या व्यापक सहभागामुळे जिल्ह्यातील नवसाक्षरता मोहिमेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नवभारत साक्षरता अभियानात रत्नागिरी जिल्ह्याची महाराष्ट्रात निवड झाली होती. याबद्दल शिक्षणाधिकारी व योजना अधिकारी किरण लोहार यांना दिल्ली येथे राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यापूर्वीही नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२३-२४ मध्ये अतिउत्कृष्ट कामाबद्दल तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शिक्षणाधिकाऱ्यांचा गौरव झाला होता.

या उपक्रमामुळे निरक्षरतेचे निर्मूलन होऊन समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल- किरण लोहार, प्राथमिक, शिक्षणाधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 25/Sep/2025