चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये सेवा पंधरवडा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरात नशामुक्ती भारत अभियानाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता भाजपा रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने २८ सप्टेंबर रोजी चिपळुणात ‘नमो युवा रन मॅरॅथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते पुढे म्हणाले की, ही स्पर्धा दोन गटात होणार असून प्रथम गट हा वय वर्ष १४ ते १८ वर्ष असेल. तर दुसरा गट हा वय वर्ष १८ पासून पुढे खुला असेल. ही ‘नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धा’ रविवार दिनांक २८ रोजी सकाळी ६:३० वा. ते १०:३० या वेळेत होणार आहे. स्पर्धेचे अंतर ३ कि. मी. आणि ५ कि. मी अशा दोन टप्प्यांमध्ये असणार आहे.
इंदिरा या स्पर्धेच्या प्रथम टप्प्याचा मार्ग गांधी सांस्कृतिक केंद्र, चिंचनाका बाजारपेठ बाजारपूल येथून पुन्हा त्याच मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे समाप्त होईल. तर दुसऱ्या टप्प्याचा मार्ग इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिंचनाका बाजारपेठ बाजारपूल-गोवळकोट कमानी येथून पुन्हा त्याच मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे समाप्त होईल. स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांकाना विजेते घोषीत केले जाईल. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल आणि शिल्ड देण्यात येणार आहे. खुल्या गटात महिला व पुरुष अशा दोन गटात ही स्पर्धा होईल.
तरी या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील/महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा सरचिटणीस प्रणाली सावर्डेकर, उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, चिपळूण ग्रामीण पूर्व तालुकाध्यक्ष विनोद भूरण, चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी, गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, चिपळूण ग्रामीण पश्चिम अध्यक्ष उदय घाग, मंडणगड तालुका अध्यक्ष प्रवीण कदम आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 25/Sep/2025














